Sunday, August 14, 2016

Jay Hind

स्वातंत्र्य


कुणापासून मिळवले आपण स्वातंत्र्य 70 वर्षांपूर्वी? “जुलमी ब्रिटिश” राजवटीपासून की आणखी कोणापासून? स्वातंत्र्याची तुमची व्याख्या काय हा तेंव्हापासून पडलेला प्रश्न आहे का नवीन युगाचा नव्याने मागोवा घ्यायची तयारी आहे? दुसरा पर्याय असेल तर मला बरे वाटेल. ७० वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला तो परदेशी अथवा एकाधिकारशाही वृत्ती पासून मुक्त होऊन लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचे राज्य स्थापन करावे यासाठी. हा अनमोल ठेवा आणि अधिकार पुढील पिढ्यानी जोपासला आणि वाढविला त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र, नवा अर्थ विचारू अथवा मांडू शकतो.

स्वातंत्र्य हा एक मूलभूत अधिकार आहे. कोणापासून पेक्षा कशासाठी हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक अधिकाराबरोबर तो वापरताना बाळगायच्या जबाबदारीचे भानही आवश्यक आहे. अन्यथा एकाचे स्वातंत्र्य हे दुसऱ्यासाठी दुष्कर ठरू शकते. आणि हेच टाळले पाहिजे.

समाजाची सर्वांगीण उन्नती साधण्यासाठी तसेच समानता, एकात्मता जोपासण्यासाठी विशिष्ठ परिस्थितीत, विशिष्ठ व्यक्तीसमूहाला अथवा व्यक्तिलासुद्धा विशिष्ठ कारणांसाठी मदतीची अथवा सवलतीची गरज असते. पण अशावेळी नुसतीच सवलत देऊन चालणार नाहीतर सर्व समाजाने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. आपण एकाला सवलत दिली तर ती दुसऱ्याचा कोठालातरी अधिकार काढून दिलेली असते त्यामुळे अशी कोठलीही सवलत प्रसंगानुरूप आणि त्या स्थळ , काळ, वेळेपुरतीच असावी. अन्यथा त्याचा दुरपयोगच होतो. प्रत्येकाला स्वतःचे व्यक्तिमत्व विकासाचे साधन योग्यप्रमाणात मिळत रहावे आणि त्याचा उपयोग करण्यासाठी त्याला समान संधि उपलब्ध होत रहावी हेच स्वातंत्र्य आपले भारतीय गणराज्य, आपल्या उन्नतीसाठी आणि आपणच पुढे नेण्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते.


जय हिंद.
गिरीश चितळे
१५ ऑगस्ट, २०१६ 

*ना आरज़ू पे क़ैद है, ना हौसले पे जंग है।
हमारे हौसले का “देश”, हमारी हिम्मतों का “देश”
(*जावेद अख़्तर च्या एक चित्रपट गीतावर आधारित )